
> गणेश आचवल
‘विठू माऊली’, ‘मन उडू उडू झालं’ अशा महत्त्वाच्या मालिकेतून काम करणारा अजिंक्य राऊत आता ‘सरी’मधील महत्त्वाच्या भूमिकेतून आपल्यासमोर आला आहे…. एक प्रॉमिसिंग चेहरा.
अजिंक्य राऊत शाळेत असताना वत्तृत्व ,वादविवाद अशा स्पर्धांतून भाग घ्यायचा. आजोबा त्याच्या कलांना प्रोत्साहन द्यायचे. त्याला नृत्याचीही आवड होती. अजिंक्य बारावीनंतर इंजिनीअरिंगसाठी पुण्यामध्ये आला.
कॉलेजला असताना प्रेझेंटेशन्स सादर करताना त्याचा आत्मविश्वास वाढला. इंग्रजीसुद्धा चांगले झाले. तो जर्मनदेखील शिकत होता. ‘विठू माऊली’ हा अजिंक्यच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. अजिंक्य सांगतो, ‘पौराणिक मालिका असल्याने त्यात मुख्य भूमिका करताना त्यातील संवाद, ती भाषा यावर खूप मेहनत घ्यावी लागते. शिवाय एक कलाकार या नात्याने तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. लोक त्या मालिकेत भावनिकरीत्या गुंतलेले असतात. प्रमाण मराठी भाषेतील संवाद त्यावर मेहनत घेणं आणि आपल्याला त्या भूमिकेत लोकांनी स्विकारणं खूप महत्त्वाचं असतं . कोठारे व्हिजन’सारख्या निर्मिती संस्थेशी मी जोडला गेलो.
‘मन उडू उडू झालं’ हा अजिंक्यच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. या मालिकेमुळे त्याच्या चेहऱयाला एक नवीन ओळख मिळाली. त्याचा एक वेगळा लूक लोकांसमोर आला. आता ‘सरी’ मध्ये त्याने रोहित ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या व्यक्तिरेखेला विविध पैलू आहेत. हा चित्रपट एक भावनिक प्रवास आहे. त्याने काही म्युझिक व्हिडीओदेखील केले आहेत. मुळात त्याला नृत्याची आवड आहे. नृत्य आणि संगीत हे भावना आणि कथा उत्तम प्रकारे अभिव्यक्त करण्याचे एक माध्यम आहे, असे तो सांगतो.
आगामी प्रोजेक्टविषयी काही….
नवीन गोष्टी शिकायला मला आवडतात. कलाकारानं एका इमेजमध्ये अडकून राहू नये. वैविध्यपूर्ण भूमिका करून त्याने स्वतःला सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. मलादेखील भविष्यात अशा विविध भूमिका करायच्या आहेत. माझे काही चित्रपट चित्रित झाले आहेत, त्याविषयी लवकरच तुम्हाला कळेल, असे अजिंक्य राऊतने सांगितले.




























































