शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील अनुपस्थितीबाबत विचारला प्रश्न; अजित पवार पत्रकारावर चिडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर दोन दिवस पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पक्षनेते, कार्यकर्त्यांच्या रेट्यानंतर निवृत्तीची निर्णय मागे घेत असल्याची घोषणा शुक्रवारी शरद पवार यांनी केली. मात्र, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित राहिल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. यावर प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर चिडले.

अजित पवार म्हणाले, शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यावर सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. मी स्वत: ट्वीट करत प्रेसनोट काढली आहे. स्वतः शरद पवारांनी सांगितले, माझा आणि पत्रकारांचा जास्त संबंध येत नाही, कारण मी कामाचा माणूस आहे. त्यामुळे अशा प्रश्नांना अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कायमच तुमच्याबद्दल संभ्रमाचे वातावरण का निर्माण केले जाते? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी खास आपल्या मिश्कील शैलात उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही प्रश्न विचारता, म्हणून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जाते. आमच्यावर अतिशय प्रेम करणारे जे लोक आहेत, ते माझ्याबद्दल संभ्रमाचे वातावरण तयार करतात, असे ते म्हणाले.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित का होता, असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार पत्रकारावर चिडले. त्याबद्दल शरद पवारांनी सांगितलं आहे ना… पुन्हा, पुन्हा काय रे तेच ते… प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पी. सी. चाको आणि केरळचे आमदार तिथे उपस्थित होते. तसेच, पत्रकार परिषदेत चार-पाच खुर्च्या असतात. त्यामुळे शरद पवारांनी येऊ नका सांगितलं होतं, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत विचारल्यावर अजित पवारांनी सांगितले की, आपले काही विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे. त्यांनी केंद्रातील किंवा मणिपूरमधील यंत्रणांशी संपर्क साधावा आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणावे, असे त्यांनी सांगितले.