ते आले… त्यांनी पाहिले आणि झापले; अजित पवारांच्या अचानक सातारा दौऱ्याने अधिकाऱ्यांची उडाली धावपळ

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी सकाळी अचानक सातारा जिल्हा दौऱ्यावर आल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली. त्यातच त्यांना नवीन शासकीय विश्रामगृहाच्या कामातील दोष आढळून आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी झापले,’ असे या दौऱ्याचे इतिवृत्त सर्वत्र पसरले.
नवीन शासकीय विश्रामगृहात काहीवेळ थांबल्यानंतर तत्काळ ते कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याकडे मार्गस्थ झाले.

अजित पवार अचानक शुक्रवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. सुरक्षारक्षक सोडल्यास, शासकीय लवाजमाविना ते सकाळी सातारा शहरातील नवीन विश्रामगृहावर दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार व कार्यकर्तेही या दौऱ्याबाबत अनभिज्ञ होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी यांनी पवार यांचे स्वागत केले.

यावेळी त्यांचे लक्ष विश्रामगृहाच्या पोर्चमधील तुटलेल्या फरशांकडे गेल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपये बांधकामासाठी खर्च करूनही असे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याबाबत त्यांना चांगलेच फैलावर घेतले.