छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताने पाठवलं सुपारी घेतल्याचं पत्र

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेता बोजवारा उडालेला असतानाच आता शिंदे-भाजपासोबत सत्तेत बसलेल्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नाशिक येथील कार्यालयात अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून भुजबळ यांना ठार मारण्याची सुपारी घेतल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून भुजबळ यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात एक पत्र आले आहे. या पत्रामध्ये भुजबळ यांना जीवे मारण्यासाठी सुपारी घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पाच जणांना 50 लाख रुपयांची सुपारी घेतल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

काय आहे पत्रात?

“साहेब तुम्हाला उडवण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर-दिंडोरी-चांदशी इथे हॉटेलमध्ये थांबले आहेत. या लोकांनी तुम्हाला उडवण्याची 50 लाख रुपयांची सुपारी घेतली आहे. या गुंडांपासून सावध राहा, हे 5 जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत. सागर हॉटेलसमोर यांची मिटिंग झाली आहे. साहेब सावध राहा”, असे या पत्रात म्हटले आहे. हे पत्र हाताने लिहिण्यात आले असून यामुळे खळबळ उडाली आहे.

सुरक्षेत वाढ 

दरम्यान, धमकीच्या पत्रानंतर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दोन पोलीस अधिकारी, अंबड पोलीस ठाण्याचे 10 आणि आरसीबीचे 10 पोलीस कर्मचारी भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे याआधीही भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.