
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी अस्तनीत निखारा बाळगलाय, त्यांनी विषारी साप पाळलाय! छगन भुजबळ यांचे डोके फिरले असून ते मराठ्यांचे वाटोळे करण्याचे काम करत असल्याचा पलटवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मनोज जरांगे यांना आरक्षणातले काही कळत नाही, मुळात ते किती शिकलेले आहेत हेच कळत नाही, असा हल्लाबोल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. त्याला आज मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले. छगन भुजबळ हे हतबल, हताश झाले असून त्यांचे डोकेही फिरले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करत आहेत. मराठा समाजाला शत्रू समजण्यात येत असून इतर जातींना खोटी आश्वासने देऊन आमच्या विरोधात उभे करण्यात येत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
बीड येथे काढण्यात येणारा मोर्चा हा अजित पवार पुरस्कृत असून मराठा समाजाच्या विरोधातील षड्यंत्राचा तो एक भाग असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. अजित पवार यांनी आपल्या पक्षात साप पाळले असून एक दिवस त्यांना नक्कीच याचा पश्चात्ताप होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.





























































