कसा विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावर? मोदी-फडणवीस यांचे व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया यांचा घणाघात

महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून दादागिरी केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चेत आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांवर चौफेर टीकाही झाली. यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते. मात्र याच फडणवीस यांनी अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात चक्की पिसायला पाठवणार असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर सभेत 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. हे दोन्ही व्हिडीओ आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेअर करत कसा विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावर? असा सवाल केला आहे.

अंजली दमानिया यांनी भाजपचा दुटप्पी चेहरा उघड केला आहे. अजित पवारांसोबत हातमिळवणी करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा वापरली होती. मात्र आता त्यांना सत्तेत घेऊन बसले आहेत. त्यामुळे सिंचन घोटाळ्याची दाबून टाकलेली चौकशी पुन्हा सुरू करण्याची हिम्मत सरकार दाखवणार का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसवर जवळपास 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. आता देशाला ठरवायचे आहे की घोटाळ्यांच्या गॅरंटीला देश स्वीकरणार का? असे मोदी म्हणताना दिसत आहेत. तर अन्य एका व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना टार्गेट करताना दिसत आहेत.

70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला असून आमचे सरकार आल्यावर अजितदादा चक्की पिसिंग… पिसिंग. जलसंपदामंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला असून मी आणि विनोद तावडे यांनी 14 हजार पानांचे पुरावे दिले आहेत. भ्रष्टाचाऱ्याला पाठीशी घालणाराही तेवढाच दोषी आहे जेवढा भ्रष्टाचार करणारा आहे, असे फडणवीस म्हणतात.

एकीकडे मोदी-फडणवीस यांचे विधानं सुरू असतानाद दुसरीकडे 5 डिसेंबर 2024 रोजी महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची दृश्यही दिसत आहेत. यात अजित पवार मोदी आणि फडणवीस यांच्यासोबत हस्तांदोलन करत आहेत. याचाच दाखला देत राजकारणी कधी खरं बोलतात का? कसा विश्वास ठेवायचा जनतेने यांच्या बोलण्यावर? असा सवाल दमानिया यांनी केला.