दादांचे आमदार लहामटेंवर कंत्राटदाराचा टक्केवारीचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून सरकारी कंत्राटदाराने जळगावमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किरण लहामटे हे कंत्राटदारांकडून टक्केवारी घेत असल्याची लेखी तक्रार मुंबई कॉन्ट्रक्टर्स असोसिएशनने थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या तक्रारीला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

महायुती सरकार कंत्राटदारांच्या पैशातून चालले असल्याचा एकीकडे आरोप होत आहे. दुसरीकडे धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात एक कोटी 85 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहेत या प्रकरणात अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्याकडे संशयाची सुई वळलेली असताना आता महायुती सरकारचे आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात कंत्राटदारांनी लेखी तक्रार केली आहे.
तक्रारीत काय म्हटले आहे…

अकोले तालुक्यातील रस्ते कामांच्या निघणाऱ्या

ई-निविदा प्रक्रियेत आमदार डॉ. किरण लहामटे हस्तक्षेप करतात. आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना काम न मिळाल्यास अन्य कंत्राटदाराला ते ब्लॅकमेल करतात. डॉ. लहामटे कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्यांना शासकीय कामे मिळवून देतात. कंपनीकडे कोणतीही यंत्रसामुग्री, मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कामाचा दर्जा राहत नाही, असे असोसिएशनने तक्रारीत म्हटले आहे.

डॉ. लहामटे यांनी आतापर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघात जेवढी विकासकामे केली आहेत, त्यामध्ये त्यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांकडून टक्केवारी घेऊन कामाचे वाटप केले आहे. रस्त्यांची कामे दर्जा राखून गुणवत्तापूर्ण न झाल्याने येथील रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे रस्ते कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. तक्रार अर्जावर असोसिएशन अध्यक्ष मुकुंद काकड आणि अन्य पदधिकाऱयांच्या सह्या आहेत.