जाहिरातबाजी करून भ्रष्टाचारी मंत्र्यांना फक्त पाठीशी घालण्याचे काम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. ते केवळ सत्तेसाठी लाचार आहेत. त्यामुळेच जाहिरातबाजी करून भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना लगावला.

अमळनेर येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरापूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील सरकारमध्ये तुझ्यापेक्षा मी मोठा हे दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यासाठी कोटय़वधी रुपये जाहिरातबाजीवर खर्च करण्यात येत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱया मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी जाहिरातीत त्यांचे फोटो छापून त्यांची पाठराखण सरकारकडून सुरू आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचा धाकही राहिलेला नाही. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. मात्र त्यालाच गालबोट लावण्याचे काम सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले.