
आपण कुत्रे, मांजरी, कोंबडय़ांचे प्रतिनिधित्व करीत नाही. प्राण्यांचे आवाज काढले तर आपला आमदार विधानसभेत जाऊन टवाळी करतो हे पाहून मतदारांचा विश्वासघात केल्यासारखे होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाजप आमदार नीतेश राणे यांचे नाव न घेता विधिमंडळात संसदीय शिष्टाचाराची पायमल्ली करणाऱया सदस्यांचे कान उपटले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी विधिमंडळाच्या पायऱयांवर बसून विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती तेव्हा नीतेश राणे यांनी आक्षेपार्ह आवाज काढला होता. या घटनेनंतर सदस्यांच्या वर्तनाबात आचारसंहिता करण्याचे पत्र शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले होते. सदस्यांनी शिष्टाचार व आचारसंहितेच्या पालनाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व सर्व पक्षांच्या गटनेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सदस्यांच्या वर्तनाबाबत ‘संसदीय सभ्याचार व शिष्टाचार आचारसंहिता’ तयार करण्यात आली आहे. त्याची माहिती उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली.
अंतर्मुख होऊन विचार करा
यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेशिस्त सदस्यांना खडेबोल सुनावले. सभागृहात आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक आमदाराचे कर्तव्य आहे. विधिमंडळाचा सदस्य सभागृहात व आवारात कसा वावरतो यावरून विधिमंडळाची प्रतिमा निर्माण होते. गेल्या काही वर्षांत काही जणांच्या वर्तनामुळे सभागृहाच्या मानसन्मानाला धक्का बसला आहे. ही प्रतिमा ढासळू नये यासाठी प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
एक वर्ष बाहेर ठेवू नका
सभागृहातील गोंधळ व तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्याच्या मुद्दय़ावरून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले आहे. त्याचा धागा पकडून अजित पवार म्हणाले की, कधी काही प्रसंग घडतात ते तेवढय़ापुरते घ्यायचे असतात. त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी व विरोधकांनी चर्चेद्वारे मार्ग काढायचे आणि वेळ मारून न्यायची असते. पण जोपर्यंत नियम होत नाहीत तोपर्यंत चुकायचे थांबणार नाहीत. पण चुकले असेल तर चार तास सभागृहाच्या बाहेर काढा. अगदी वाटले तर एक दिवस बाहेर ठेवा, पण बारा महिने बाहेर पाठवू नका, असे सांगताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.
मधुकरराव चौधरींचा दरारा
मधुकरराव चौधरी विधानसभा अध्यक्ष असताना त्यांचा दरारा होता. ते उभे असतील तर आम्ही सभागृहात आडवे जायचो नाही. आता तर आमच्या आसनावरही येऊन बसतात याबद्दल अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. सभागृहात आवाज काढणे, हातवारे करणे आपल्याला शोभा देत नाही, अशा शब्दांत त्यांनी सदस्यांना सुनावले.
सरकारी अधिकाऱयांकडून अवमान
सुधीर मुनगंटीवार यावर मत मांडताना सरकारी अधिकाऱयांकडून आमदारांचा अवमान होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. जिल्हाधिकाऱयाने आमदाराला कार्यालयातील दरवाजापर्यंत सोडायला यावे असे संकेत आहे. पण जिल्हाधिकारी दोन-दोन तास दरवाजा उघडत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. सरकारी अधिकाऱयांकडून मिळणाऱया वागणुकीबाबत साठ दिवसांत आमदारांचे अनुभव मागवावेत अशी सूचना त्यांनी केली.
पोलीसही आम्हाला विचारत नाही
सरकारी अधिकाऱयांकडून आमदारांना मिळणाऱया वागणुकीबद्दल भास्कर जाधव यांनी तुफान टोलेबाजी करीत भाषण केले. अहो, साधा वाहतूक पोलीस आम्हाला विचारत नाही. वाहतुकीचे नियम तोडले तर पोलीस राजकीय कार्यकर्त्याला थांबवतो. कार्यकर्ता आमदाराला फोन करतो आणि आमदाराने फोन पोलिसाला दे असे सांगितले तर पोलीस फोनवरही येत नाही. तलाठीही आमचे ऐकत नाही. 90 टक्के अधिकार अधिकाऱयांना, लोकप्रतिनिधींकडे केवळ जबाबदारी आहे का, असा प्रश्न विचारत सरकारी अधिकाऱयांनाही आचारसंहिता लागू करण्याची मागणी केली. या चर्चेचा समारोप करताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी संसदीय सदस्यांसाठी शिष्टाचार व आचारसंहितेची पुस्तिका सदस्यांना वितरित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी सोडा
सभागृहात येताना आणि बाहेर जाताना अध्यक्षांना नमस्कार करायचा याचं भानही सदस्यांना राहिले नाही. सभागृहात अध्यक्षांना पाठ दाखवत गप्पा मारत बसतात. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एक सदस्य तर निवेदन देण्यासाठी आले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या आसनावर बसले होते. अरे बाबांनो, मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी राहू दे असे सांगण्याची वेळ आली आहे. अरे, तुम्हाला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बसा, पण सदस्य ऐकत नाहीत. यावर पुन्हा एकदा हास्याची लकेर उमटली.

































































