
तपोवन परिसरातील सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोपचारातून तोडगा काढण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, विकासकामे सुरू असताना स्थानिकांच्या भावना व पर्यावरणीय परिणाम यांचा गांभीर्याने विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अजित पवार यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या भुमिकेला पाठिंबा जाहीर केला आहे.
अजित पवार यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले. “सजाजी शिंदे यांनी पर्यावरणाच्या हितासाठी मांडलेल्या मुद्द्यांचा आदर करायला हवा. त्यांच्या भावनेत प्रामाणिकपणा आहे आणि पर्यावरण संवर्धनासाठी दिलेली त्यांची भूमिका महत्त्वाची आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री यांनी विकास आणि पर्यावरण व्यवस्थापन हे दोन्ही हातात हात घालून चालले पाहिजे, असे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, शहरात विविध पायाभूत सुविधा उभारल्या जात असतानाही निसर्गाचा समतोल बिघडता कामा नये. तंत्रज्ञान आणि नियोजनाच्या मदतीने पर्यावरणपूरक पर्याय शोधणे शक्य आहे, असेही ते म्हणाले. “पर्यावरण वाचले तरच भावी पिढी सुरक्षित राहील,” असे सांगत अजित पवार यांनी नागरिक आणि प्रशासनाने परस्पर चर्चा करून एकमेकांना मान्य असा मार्ग काढण्याचे आवाहन केले. वृक्षतोडीसंदर्भातील निर्णय वैज्ञानिक पद्धतीने आणि सर्व संबंधित पक्षांच्या सहभागातून होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.


























































