
संयुक्त जनता दल पक्षाचे प्रमुख आणि तब्बल 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी आज राज्यसभेसाठी अर्ज भरला. जदयूमधील नेत्यांना व कार्यकर्त्यांना देखील नितीश कुमार यांच्या निर्णयाचा धक्का बसला आहे. त्यांच्या निर्णयावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनी नितीश कुमार यांना जोरदार टोला लगावला आहे.
बिहार के इतिहास का सबसे बड़ा अपहरण!
ये दिखने में राजनीतिक अपहरण है, लेकिन दरअसल ये बिहार का आर्थिक अपहरण है।
भाजपा ने तो फिरौती में पूरा बिहार माँग लिया।
अगला नंबर… समझदार को इशारा काफ़ी। pic.twitter.com/ziMQUNlB7w
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 5, 2026
”बिहारच्या इतिहासातले हे सर्वात मोठे अपहरण आहे. हे दिसायला जरी राजकीय अपहरण असले तरी प्रत्यक्षात हे बिहारचे आर्थिक अपहरण आहे. भाजपने खंडणी म्हणून संपूर्ण बिहार मागितलाय. पुढचा नंबर कुणाचा आहे हे सांगायला नको. समजदार व्यक्तीला फक्त इशारा पुरेसा असतो’, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे.
नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाणार अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली. यावर आता त्यांनी स्वत: शिक्कामोर्तब केला असून पहिली प्रतिक्रियाही दिली आहे. बिहार विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा (विधानसभा आणि विधानपरिषद) तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचा (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्य बनण्याची माझी जुनी इच्छा पूर्ण करायची आहे, असे नितीश कुमार म्हणाले. ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच नितीश कुमार यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.



























































