अक्कलकोट, मोहोळ, मंगळकेढा तालुके लम्पीचे नवे ‘हॉटस्पॉट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यात माणसांवर कोरोनाचे संकट पुन्हा येऊ लागले असताना लम्पीने जनावरांवर तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अक्कलकोट, मोहोळ व मंगळवेढा हे तीन तालुके लम्पीचे नवे हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत. जिल्ह्यात सध्या लम्पीचे 677 ऍक्टिक्ह बाधित पशुधन आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक 386 पशुधन या तीन तालुक्यांमध्ये आहे.

लम्पीने सुरुवातीच्या टप्प्यात माळशिरस, सांगोला व करमाळा या तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. आता या तालुक्यांमधील लम्पी आटोक्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक 154 लम्पीबाधित पशुधन मोहोळ तालुक्यात आहे. त्या खालोखाल मंगळकेढा तालुक्यात 140, तर अक्कलकोट तालुक्यात 92 लम्पीबाधित पशुधन आहे. जिह्यातील 39 हजार 570 पशुधनाला लम्पीची लागण झाली होती. त्यापैकी 35 हजार 235 पशुधन सध्या लम्पीमुक्त झाले आहे.

लम्पीमुळे जिह्यातील 3 हजार 685 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 1 हजार 312 मृत्यू माळशिरस तालुक्यात झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यात 60, मोहोळ तालुक्यात 217, तर मंगळकेढा तालुक्यातील 201 जनावरांचा आतापर्यंत लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. जिह्यात आतापर्यंत 3 हजार 191 मृत जनावरांच्या मालकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने 7 कोटी 60 लाख सहा हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. अनुदानवाटपाचे 452 प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. या प्रस्तावांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास एक कोटी 20 लाख रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अस्मानी अन् सुलतानी संकटांनी तो पिचला आहे. अशातच लम्पीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, त्यामुळे तो अधिकच अडचणीत आला आहे.