अक्कलकोटमध्ये रस्त्यावरून वाहतेय ड्रेनेजचे पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्कलकोट शहरातील लक्ष्मी भाजीमंडई येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागारिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याच पाण्यावरून नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत असून, सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. यात कहर म्हणजे याच वाहत्या पाण्यात भाजीविक्री होत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

नगरपालिकेने रस्त्यावर वाहणाऱया ड्रेनेजच्या पाण्याचा बंदोबस्त करावा, स्वच्छ-सुंदर तीर्थक्षेत्र अक्कलकोट प्रभावीपणे राबवून नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्याबाबत खबरदारी घ्यावी, अशी मागणी लक्ष्मी भाजीमंडईतील व्यापाऱयांनी केली आहे.

तीर्थक्षेत्र अक्कलकोटमधील लक्ष्मी भाजीमंडई ही शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. लोकांची येथे सकाळी भाजी खरेदीस गर्दी असते. भाजीविक्री बाजार कट्टे बंदिस्त असले तरी लक्ष्मी मंडई शेडमध्ये भाजीविक्रीला कोणीच विक्रेते बसत नाहीत. यामुळे भाजीविक्री रस्त्यावर होते. भाजीविक्रीचा परिसर सखल भागात आहे. भाजीमंडईच्या वरच्या बाजूस ड्रेनेजचे पाणी मोठय़ा प्रमाणात रस्त्यावरून वाहत जाऊन सखल भाग असलेल्या भाजीमंडई परिसरात वाहत आहे. यामुळे झालेल्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याच पाण्यातून नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. घाण पाण्यात थांबून विक्रेते भाजीविक्री करीत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. पाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील व्यापाऱयांना नाकाला रुमाल बांधून व्यापार करावा लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेने रस्त्यावर वाहणाऱया ड्रेनेजच्या पाण्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.