
निराधार वयोवृद्ध महिलेची हत्या करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना अकोले तालुक्यातील आंभोळ गावात शुक्रवारी घडली. याप्रकरणी अकोले व राजूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. कांताबाई तुकाराम जगधने (रा. आंभोळ) असे मृत वृद्धेचे नाव आहे.
कांताबाई यांचे आंभोळ शिवारात घर असून तेथे त्या एकटय़ाच राहत होत्या. एका व्यक्तीला घरावरची कौले बसवून देण्याचे काम त्यांनी दिले. त्याने ते घर शेकारले. मात्र, त्याची नजर वृद्धेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यावर पडली.
ताब्यात घेतलेले संशयित वृद्धेच्या घरापासून काही अंतरावर रहात आहेत. त्यांनी सायंकाळी कोतूळ गावात मद्यपान केले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी वृद्धेची हत्या केली. गळ्यातील दागिने दोघेही निघून गेले.
पोलिस उपाधीक्षक राहुल मदने, सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.































































