
लडाखवर नजर ठेवणाऱ्या चीनने आता अक्साई चीन भागात पँगाँग सरोवरापर्यंत रेल्वेमार्ग बनवण्याची तयारी सुरू केली आहे. चीनची ही महत्त्वाकांक्षी योजना शिंजियांग आणि तिबेटला जोडण्यासाठी आखण्यात आली आहे. हा रेल्वेमार्ग चीनच्या हिंदुस्थानच्या प्रत्यक्ष नियंत्रण सीमारेषेजवळून जाणार आहे.
तिबेटच्या सरकारतर्फे या रेल्वेमार्गाची माहिती देण्यात आली आहे. चिनी रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा 2025पर्यंत पूर्ण होणार आहे. हा टप्पा शिआगात्से ते पखुक्त्सो असा असेल. उर्वरित टप्पा होटानपर्यंत असेल, जो त्यापुढील दहा वर्षांत म्हणजे 2035 पर्यंत पूर्ण होईल.
द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, चीनतर्फे तिबेटसाठी मध्यम आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्याअंतर्गत रेल्वेमार्गाला 1400 किमीपासून 4000 किमीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. हा नवीन रेल्वेमार्ग हिंदुस्थान आणि नेपाळच्या सीमेलगत असेल. अक्साई चीनमधून जाणाऱ्या महामार्गाने हिंदुस्थान आणि चीनमधील तणाव वाढला होता. त्यानंतर 1962 सालात याच मार्गावरून युद्ध झालं होतं.
चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025पर्यंत अनेक महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्ग हातात घेतले जातील. प्रादेशिक दळणवळणांच्या विकासासाठी ही योजना आखण्यात आली आहे. याद्वारे सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.




























































