
कोरोना महामारीत अनेकांना दोनवेळचे जेवण मिळणे मुश्कील झाले आहे. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्यांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी अक्षय पात्र फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला असून आतापर्यंत 47 लाखांहून अधिकांना भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कोरोना संकटात सरकारसोबत अक्षय पात्र फाऊंडेशने वंचित लोकांना सहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व संभाजीनगरमध्ये गरजूंना शिजवलेले भोजन, रेल यात्री फूड किट्सचे वाटप फाऊंडेशनकडून करण्यात येत आहे. त्यासोबतच फूड रिलीफ किट्सच्या माध्यमातून आवश्यक किराणा माल वंचित लोकांना देण्यात येत आहे.
एमडीएम लाभार्थ्यांना हॅप्पीनेस किट्सदेखील देण्यात येत असून प्रत्येक किटमध्ये ड्राय रेशन, शैक्षणिक साहित्य व स्वच्छताविषयक उत्पादनांचा समावेश आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले क्लासरूम व मध्यान्ह भोजनांपासून वंचित राहिली आहेत. ज्यामुळे या उपक्रमातर्फे घराघरांपर्यंत पोषण व शिक्षणाची सुविधा देण्याचा एक प्रयत्न आहे.
स्थलांतरित मजुरांना यात्री सेवा किट्सचे वाटप
अक्षय पात्रने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे स्थलांतरित मजुरांना 50 हजारांहून अधिक यात्री सेवा किट्सचे वाटप केले. या किट्समध्ये पाण्याची बाटली, चिक्की, नमकीन, ज्यूस, ताक, बिस्किटे आणि मास्कचा समावेश आहे.
n पुण्यामध्ये अक्षय पात्र खडकी पॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल येथील कोरोना रुग्ण व कर्मचारी वर्गाला भोजन देत आहे. नागपूरमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज-नागपूर, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आणि लता मंगेशकर हॉस्पिटलमधील रुग्ण व कर्मचारी वर्गाला शिजवलेल्या भोजनाची सुविधा दिली जात आहे.






























































