
>> अक्षय शेलार
बँक दरोडय़ाच्या तणावपूर्ण वातावरणातील गडद विनोदी मिश्रणातून अमेरिकन समाजातील विसंगती उलगडून दाखवणारा परंतु तितकाच धगधगत्या काळाचा सामाजिक दस्तऐवज ठरावा असा हा चित्रपट.
1970च्या दशकात न्यू हॉलीवूड चळवळीने अमेरिकन सिनेमाला एक वेगळीच धार दिली होती. पारंपरिक स्टुडिओ फिल्म्सच्या बटबटीत चमकदारपणाला झटकून वास्तववादी कथा, नैतिक गुंतागुंत आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारे सिनेमे पडद्यावर दिसू लागले. सिडनी लुमेचा ‘डॉग डे आफ्टरनून’ (1975) हा त्याच काळाचा प्रतीकात्मक आणि प्रभावी नमुना आहे. खऱया घटनेवर आधारित असलेली ही कथा एका बँक दरोडय़ाच्या वातावरणात तणावपूर्ण आणि गडद विनोदी मिश्रणातून अमेरिकन समाजातील विसंगती उलगडून दाखवते.
वरवर पाहता चित्रपटाची कथा फार सोपी आहे. अल पचिनोने साकारलेला सॉनी आणि त्याचा साथीदार सॅल (जॉन कझेल) हे दोघेजण ब्रुकलिनमधील एका बँकेत शिरतात. त्यांचा हेतू फार मोठा नाही. ही त्यांची पहिलीच चोरी. फक्त थोडे पैसे घेऊन बाहेर पडायचे, पण हळूहळू परिस्थिती हाताबाहेर जाते. पोलीस, माध्यमं आणि नागरिक या तिघांच्या वेढय़ात हे दोन गुन्हेगार अडकतात.
लुमेने हा चित्रपट ज्या पद्धतीने साकारला आहे, त्यात सर्वप्रथम लक्ष वेधून घेतो तो त्यातला वास्तववाद. दिग्दर्शकाने स्टुडिओ-निर्मित कृत्रिमता टाळून हँडहेल्ड कॅमेरे, नैसर्गिक प्रकाश योजना आणि विस्तृत संवादांद्वारे वातावरणाला डॉक्युमेंटरीसदृश परिणाम मिळवून दिला आहे. या चित्रपटाचा आणखी एक ठळक पैलू म्हणजे माध्यमांची भूमिका. बाहेरच्या रस्त्यावर वाढणारा जमाव, टेलिव्हिजनमध्ये प्रसारणाचे काम करणाऱया लोकांचे चमू, सतत चिथावणी देणारे पत्रकार हे सर्व मिळून गुह्याच्या गंभीरतेचा उपहास बनवून सोडतात. सर्कसच म्हणा की!
सॉनी या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना एक महत्त्वाची सामाजिक-राजकीय छटा दिसते. तो फक्त चोर किंवा गुन्हेगार नसतो. त्याच्या कृतीमागे असतात ती वैयक्तिक आणि भावनिक कारणं. त्याच्या जोडीदाराच्या सेक्स रीअसाइनमेंट सर्जरीसाठी लागणाऱया पैशांची गरज. 1970च्या दशकातील अमेरिकेत ही गोष्ट अत्यंत धाडसी होती. अशा पायावर व्यावसायिक सिनेमा उभा करणे हे नक्कीच न्यू हॉलीवूडच्या वैशिष्टय़पूर्ण बंडखोरीमधून उपजले होते. अशी एक कृती, जी लैंगिकता, एखाद्या व्यक्तीची (लैंगिक) ओळख आणि कुटुंब संस्थेच्या तत्कालीन संकल्पनांवर प्रश्न उपस्थित करते. काही तत्कालीन समीक्षकांच्या मते, चित्रपटाने लैंगिक ओळखीच्या प्रश्नाला संपूर्ण गांभीर्याने हाताळले नाही. उलट तो मुद्दा कथानकासाठी सोयीस्कररीत्या वापरला, परंतु त्या काळातील सामाजिक संदर्भातही अशा विषयाची मांडणी धाडसी आणि प्रभावी होती.
पचिनोच्या अभिनयाशिवाय हा चित्रपट अपूर्ण राहिला असता. त्याचा सॉनी एकाच वेळी घाबरलेला, हतबल, प्रेमळ, आत्मविश्वासी आणि क्वचित विनोदी वाटतो. जॉन कझेलचा सॅल मात्र त्याच्यासमोर स्थिर, मितभाषी आणि भेसूर वाटणारा ठरतो. या दोन परस्परविरोधी छटा कथा अधिक गुंतागुंतीची करतात.
चित्रपटाची पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे.
1970च्या दशकातील अमेरिकेत व्हिएतनाम युद्ध, नागरी हक्क चळवळी, आर्थिक अस्थिरता यामुळे नागरिकांचा ‘स्टेट’विषयी अविश्वास वाढत होता. ‘डॉग डे आफ्टरनून’मध्ये पोलिसांचा ढोंगीपणा, माध्यमांची रंजनाप्रतीची बेफाम भूक आणि सामान्य लोकांची उत्सुकता या सर्व गोष्टी एकत्र येऊन त्या काळातील ‘अमेरिकन ड्रीम’ची खचलेली प्रतिमा उभी करतात.
त्यामुळेच ‘डॉग डे आफ्टरनून’ हा फक्त बँक दरोडय़ाचा तणावपूर्ण थरारपट नाही. तो त्या काळातील अमेरिकन समाजाच्या राजकीय, सांस्कृतिक आणि मानसिक स्थितीचा दस्तऐवज आहे. न्यू हॉलीवूड चळवळीच्या इतिहासात हा चित्रपट एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. कारण त्याने गुह्याच्या आणि वास्तवाच्या सीमारेषा पुसून टाकल्या आणि आपल्यासमोर उभा एक माणूस आरपाररीत्या उभा केला.
या चित्रपटातून गुन्हा, प्रेम, लैंगिकता, माध्यमांचं विकृत राजकारण आणि राज्यव्यवस्थेवरील अविश्वास हे सारे धागे कसे गुंतलेले आहेत हे स्पष्टपणे दिसते. नागडं वास्तव आहे तसं उभं करणं, प्रस्थापित चौकटींना मोडणं आणि प्रेक्षकाला अस्वस्थ करणं या दृष्टीने या चित्रपटाने न्यू हॉलीवूडचा सूर बरोबर चिमटीत पकडला होता.
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)
[email protected]






























































