‘अक्षय्य’ मुहूर्तावर खरेदीसाठी झुंबड, सराफा बाजारात 200 कोटींची उलाढाल

अक्षय्य मुहूर्त साधत सोने, घर, नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली. बुधवारी सोन्याचे दर 1 लाख 631 रुपयांवर पोहोचले तरी ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत होता. मुंबईतील सराफा बाजारात दिवसभरात 82 टन सोन्याच्या विक्रीतून दोनशेहून अधिक कोटी रुपयांची उलाढाल झाली. काहींनी लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी केली तर काहींनी गुंतवणूक म्हणून सोन्याचे नाणे, बिस्किट खरेदी केले.

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोन्यासह घर, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीतून दिवसभरात हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली. अनेकांनी आदल्या दिवशीच इलेक्ट्रॉनिक वस्तू बुक केल्या होत्या. गाडय़ांच्या शोरुमबाहेर दुचाकी, चारचाकी गाडय़ांची पूजा करताना लोक दिसत होते. यंदाही लोकांमध्ये इलेक्ट्रिक गाडय़ांची व्रेझ पाहायला मिळाली. अनेक विकासकांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त घर खरेदीदारांसाठी मोफत गोल्ड कॉईन, आजच बुक केल्यास 10 टक्के सूट अशा नानाविध ऑफर्स ठेवल्या होत्या. मुंबईत संध्याकाळपर्यंत 1416 घरांचे रजिस्ट्रेशन झाले. याशिवाय प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायकसह मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिरात देवतांना आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.