
E=mc2 सिद्धांताचा आविष्कार करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइंस्टीन यांच्या एका पत्राचा नुकताच लिलाव करण्यात आला आहे. आइंस्टीन यांचे हे पत्र खूपच खास आहे. याच पत्रात त्यांनी आपला E=mc2 चा सिद्धांत लिहिला होता. त्यांनी आपल्या आयुष्यात फक्त चार वेळा E=mc2 लिहिले होते. त्यामधील एक पत्र सार्वजनिक करण्यात आले आहे. आता याच पत्राचा लिलाव करण्यात येत आहे. आइंस्टीन यांना थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचे जनक देखील मानले जाते.
अल्बर्ट आइंस्टीन यांच्या या ऐतिहासिक पत्राचा लिलाव 4 लाख डॉलर म्हणजेच 2 कोटी 80 लाख रुपयांपर्यंत होऊ शकतो, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र प्रत्यक्ष लिलावात याची तीन पट्टीने अधिकची बोली म्हणजेच 13 लाख डॉलर ( 9 कोटी रुपये) इतकी लावली गेली आहे. त्यांचे हे पत्र ऐतिहासिक असल्याचे मानले जाते. म्हणूनच याची बोली 9 कोटी रुपयांपर्यंत लागली आहे.
आइंस्टीन यांनी जर्मन भाषेत लिहिलं होत हे पत्र
13 मे रोजी आइंस्टीन याच्या या पत्राचा लिलाव सुरु झाला. याला खरेदी करण्यासाठी 5 लोकांनी बोली लावली. आइंस्टीनच्या या पत्राची शेवटची बोली 1.3 मिलियन डीलर्स इतकी लागली आहे. आइंस्टीन यांनी हे पत्र 26 ऑक्टोबर 1946 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ लुडविक सिल्बर्स्टाईन यांना लिहिली होती. त्यांनी हे पत्र जर्मन भाषेत लिहिले होते. ज्यात त्यांनी लिहिलं होत की, तुम्ही मला जो प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर E=mc2 सिद्धांतातून मिळू शकते. आइंस्टीन यांचे हे पत्र सिल्बर्स्टाईन यांनी जपून ठेवलं होत. ज्याचा आता लिलाव होत आहे.




























































