चिंतेत आणखी भर… ही तिसऱया लाटेची ठकठक? नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीत डेल्टा-प्लस सापडला

राज्य कोरोना लाटेतून सावरत असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट डेल्टा प्लस विषाणूमुळे येऊ शकते असा अंदाज बांधला जात असतानाच रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिह्यांतून घेतलेल्या नमुन्यांत SARS-COVed-2  हा डेल्टा प्लस  व्हेरिएंट  सापडला आहे. सात रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून अधिक नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिह्यात गावागावांत नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱया जिह्यांमध्ये हा जिल्हा मोडतो. रत्नागिरीबरोबरच मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई, पालघर जिह्यांतही रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट विषाणू आढळल्याने मुंबईकरांच्याही चिंतेतही भर पडली आहे.

हा म्युटंट स्ट्रेन परदेशातून संक्रमित झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या गावांत हे रुग्ण सापडले ती गावे सील करण्यात आली आहेत. या गावांमध्ये परदेशातून नागरिक ये-जा करतात. त्यामुळे परदेशातून येणाऱया नागरिकांमधून हा स्ट्रेन संक्रमित झाल्याचा अंदाज वरिष्ठ आरोग्य अधिकाऱयांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

डेल्टा प्लसला गांभीर्याने घ्या – डॉ. रणदीप गुलेरिया

कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूला गांभीर्याने घ्या. जर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे योग्य पालन केले नाही तर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढेल. हा विषाणू स्वतःला वाचविण्यासाठी आपले स्वरूप बदलत आहे. याआधी हिंदुस्थानात डेल्टा विषाणूचे संसर्गित रुग्ण आढळून आले होते. पुन्हा या विषाणूने आपले स्वरूप काही प्रमाणात बदलले असून हा डेल्टा व्हायरसपेक्षाही अधिक वेगाने संसर्ग पसरवू शकतो. त्यामुळे तिसऱया लाटेचा धोका संभवत असून याबाबत गांभीर्याने पावले उचलावी लागतील, असा इशारा दिल्लीतील एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

मुंबईला दिलासा

मुंबईत दिवसभरात 733 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 650 जणांनी कोरोनावर मात केली. 24 तासांत 19 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील रिकव्हरी रेट 95 टक्के इतका झाला असून रुग्णदुपटीचा कालावधी 726 दिवस झाला आहे. राज्यातही 9361 नवीन रुग्णांचे निदान झाले, तर 190 मृत्यूंची नोंद झाली.

कोरोनाबळींसाठी 4 लाखांची भरपाई देऊ शकत नाही; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

कोरोनामुळे प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना सरकार 4 लाखांची भरपाई देऊ शकत नाही. आपत्ती कायद्याखाली द्यावयाची भरपाई केवळ भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीसाठीच लागू होते. एका आजारासाठी भरपाई देणे आणि दुसऱया आजारासाठी न देणे हे चुकीचे ठरेल, असे म्हणणे केंद्र सरकारने सर्वेच्च न्यायालयात मांडले. तसेच कुठेही कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याची कोरोनाबळी म्हणून नोंद होणार आहे.

 नागपूर सावरतंयसलग तिसऱया दिवशी शून्य मृत्यू

कोरोनाच्या दुसऱया लाटेत नागपूर जिल्हय़ात हाहाकार उडाला होता. मोठी रुग्णसंख्या आणि मोठी मृत्युसंख्या नागपूरने अनुभवली. पण आता दिलासा मिळतो आहे. कोरोना मृत्यूचा दर सलग तिसऱया दिवशी शून्य नोंदवला गेला आहे. नागपूर शहरात तब्बल 133 दिवसांनंतर सलग तीनही दिवस एकही मृत्यू नोंदवला गेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या