
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव राहाता तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तसेच रब्बी पिकासाठी पाण्याची गरज असताना जलसंपदा विभागाने समन्ययीच्या नावाखाली गोदावरी नदीतून जायकवाडीला पाणी सोडले. तसेच या धरणातील पाणी सुद्धा या परिसरातील शेतकर्यांना देण्याला प्राधान्य देण्याऐवजी जायकवाडीला प्राधान्याने पाणी पुरवण्याचा निर्णय राज्याच्या जलसंपदा विभागाने घेतल्यामुळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील शेतकर्यांमध्ये असंतोष धुमसत होता. रब्बी पिकांच्या पेरणी करण्याचा कालावधी संपत आला तरी व्यवस्थापन पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत आहे तर आता तर फळ्या काढा म्हणण्यांपर्यंत त्यांची मजल गेली. यापुढे दारणा धरणातुन थेंबही पाणी जाऊ देणार नाही, अशी कणखर भुमिका आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जाहीरपणे मांडली आहे. तेंव्हा सर्वपक्ष एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत मात्र याचे नेतृत्व आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी करावे, अशीही मागणी सर्वच स्तरातून होत असतांना शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे व तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनीही याला दुजारा दिला आहे. तर पाणी प्रकरणी नेतृत्व करून शेतकरी संपाप्रकरणी नाराज शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आमदारांनी करावे असाही एक मतप्रवाह व्यक्त होत आहे.
सद्य परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे प्राप्त माहितीच्या आधारे म्हणतात कि, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाने दारणा समुहातून ५७.४ दलघमी पाणी जायकवाडी साठी सोडण्याचे निर्देश दिले होते. याचा अर्थ कडवा, भाम, भावली, वालदेवी, आळंदी, मुकणे, दारणा, वाकी ह्या आठ धरणातून ५७.४ दलघमी पाणी सोडायचे असा होता. पण प्रत्यक्षात दिनांक १५ऑक्टोबर व ११ नोव्हेंबर या कालावधीतील साठ्यांची तुलना केल्यास ह्या धरणातील पाणी वापर कडवा १ दलघमी, गंगापूर १३ दलघमी, भावली १२ दलघमी, मुकणे १४ दलघमी, दारणा ८५ दलघमी, इतका झाला आहे. दारणा धरणात आता १८८ दलघमी पैकि केवळ १०३ दलघमी पाणी शिल्लक राहीले आहे. आता राहाता व कोपरगाव तालुक्यात पिण्यासाठी केवळ १०३ दलघमी म्हणजे साडेतीन टीएम सी पाणी शिल्लक राहीले. जर नगर व नाशिकच्या सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर एकटे दारणा धरण मोकळे झाले नसते. मराठवाडाचे मुकणे, वालदेवी, भाम, भावली व जायकवाडी धरणे भरलेली आहेत. ते शेतीसाठी व उद्योगासाठी पाणी वापरणार व कोपरगाव – राहाता केवळ पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून मंत्रालयात कटोरी घेऊन उभे राहावे लागणार आहे. आता गोदावरी नदीत असलेले कोल्हापूर पध्दती चे धरणातील साठलेले पाणी ते मागू लागले आहेत. तेंव्हा ते पाणी थांबवून दाखविण्याचे मोठे आव्हान नेत्यांपुढे आहे. अन्यथा कोपरगाव राहाता तालुक्यात आता पाणी पिण्यासाठीच येणार… साठवण क्षमता नसल्यामुळे पिण्याचे पण हाल होणार, नेत्यांनी वेळीच भूमिका घेतली नाही म्हणून दारणा रिक्त झाले. आता कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पण मोकळे होणार आणि कोपरगावची जनता उध्वस्त होणार, जनावरांना चारा व पाणी नसल्यामुळे कत्तलखान्यात जावे लागणार असल्याची भीती व्यक्त करतांना काळे यांनी जबाबदार शासन नेते सर्वांचा निषेध केला आहे.





























































