
राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची हुकूमशाही व मनमानी कारभाराविरुद्ध शड्डू ठोकलेल्या देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी आपल्या आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. कुस्तीपटू आणि क्रीडा मंत्रालय यांच्यात तासभर चर्चा झाली, मात्र या चर्चेनंतरही खेळाडूंचे समाधान झालेले नाही. आम्ही कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ अन् त्यांना तुरुंगातही पाठवू, असा निर्धार आंदोलनकारी कुस्तीपटूंनी केला आहे.
आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा
अध्यक्ष व प्रशिक्षकांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने याचे तीव्र पडसाद देशभरात उमटायला सुरुवात झाली आहे. जंतरमंतरवरील एकवटलेल्या कुस्तीपटूंना मोठा पाठिंबा मिळत असून या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत क्रीडा मंत्रालयाने बुधवारी रात्रीच राष्ट्रीय कुस्ती महासंघाला नोटीस पाठविली आहे.
भक्कम पुराव्यांसह आंदोलनात उतरलोय!
क्रीडा मंत्रालयाशी झालेल्या चर्चेबद्दल आम्ही समाधानी नसल्याचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश पह्गाटने सांगितले. ही आमच्या आत्मसन्मानची लढाई आहे. भक्कम पुराव्यांसह आम्ही या आंदोलनात उतरलो आहोत. महिला कुस्तीपटूंची अब्रू चव्हाटय़ावर आणू नका. ज्या दिवशी सगळय़ा महिला कुस्तीपटू मीडियापुढे येऊन या लोकांच्या काळय़ा कृत्यांचा पर्दाफाश करतील तो दिवस हिंदुस्थानी कुस्तीतील दुर्दैवी दिवस असेल. बृजभूषण सिंह आणि त्यांच्या सहकाऱयांविरुद्ध आम्ही पोलिसांत तक्रारही दाखल करू शकतो, असा इशाराही विनेश पह्गाटने सर्व आंदोलनकर्त्यांच्या वतीने दिला.
बृजभूषण राजीनामा देण्याची शक्यता
राष्ट्रीय कुस्ती महासंघाची कार्यकारी समिती आणि वार्षिक सर्वसाधारण सभा 22 जानेवारीला अयोध्येत होणार आहे. या बैठकीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आपल्या राजीनाम्याची घोषणा करू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.
स्पॉन्सरशिपमधील अर्धी रक्कम अध्यक्षांकडे
अध्यक्ष खेळाडूंना मिळणाऱया स्पॉन्सरशिपमधून अर्धी रक्कम घेतात, असा आरोप कुस्तीपटू पह्गाट भगिनींचे वडील महावीर पह्गाट यांनी केला आहे. त्यांना अर्धी रक्कम दिली नाही तर स्पॉन्सरवर आक्षेप घेऊन त्यांना परवानगी नाकारतात. बृजभूषण सिंह लखनौमध्ये राहतात म्हणून क्रीडा शिबिरे तेथेच आयोजित होतात. ज्या हरयाणाने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू दिले त्या हरयाणात बृजभूषण अध्यक्ष झाल्यापासून एकही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा झालेली नाही.























































