नरेंद्र मोदी यांचा खेळ संपला, पाच राज्यांत ‘इंडिया‘ आघाडी जिंकणार

10राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला दणदणीत विजय मिळणार आहे, असे भाकीत राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी केले. इंडिया आघाडीचा विजय पक्का असून आता नरेंद्र मोदी यांचा खेळ संपला आहे, असेही लालूप्रसाद यांनी म्हटले आहे.

लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी दिल्लीत मीडियाशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. लालूप्रसाद यादव सध्या दिल्लीत आहेत. जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी आज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टातील सुनावणी पार पडली. ही सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. या घोटाळय़ात लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह 17 जणांचा समावेश आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या तुलनेत भाजपकडे एकही नेता नाही. भाजपच्या लोकांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बिनबुडाचे काहीही आरोप करतात, असेही लालूप्रसाद यादव म्हणाले.

तेलंगणात आज मतदान; कडक सुरक्षा तैनात

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी अखेरचे राज्य असलेल्या तेलंगणात उद्या, 30 नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. हैदराबादेत कलम 144 लागू करण्यात आले असून उद्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेज आणि दारूची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. तेलंगणात एकूण 119 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तेलंगणात एकूण 3.17 कोटी मतदार असून यापैकी 8.11 लाख मतदार हे फर्स्ट वोटर आहेत. या निवडणुकीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसोबत 2.5 लाखांहून जास्त कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले आहेत.