
पेणकरपाडा येथील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयावर ‘दरोडा’ पडला आहे. एका चोरट्याने या शौचालयाचे दरवाजे तोडून त्यातील अॅल्युमिनियमच्या पट्ट्या चोरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पालिका कर्मचाऱ्याने या चोरट्याला रंगेहात पकडले. रवि विश्वकर्मा असे आरोपीचे नाव असून तो नायगाव येथे राहतो. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेणकरपाडा येथील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याने सक्शन मशीनची मागणी केली होती. त्यानुसार महावीर नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ सक्शन मशीन पाठवण्यात आली. महापालिका कर्मचारी अमित कारके हे कामाची पाहणी करण्यासाठी तेथे गेले असता रवि विश्वकर्मा हा शौचालयाचे दोन दरवाजे तोडून अॅल्युमिनियमच्या पट्ट्या पळवण्याच्या तयारीत होता. अॅल्युमिनियमच्या पट्ट्या काढून त्या एका बॅगमध्ये भरत असल्याचेही त्यांनी पाहिले. हा प्रकार लक्षात येताच कारके यांनी स्थानिकांच्या मदतीने आरोपीला पकडले. महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.






























































