
सामना प्रतिनिधी, मुंबई
तो आला, त्याने पहिले, त्याने जिंकलेच्या थाटात मुंबई इंडियन्सच्या अल्झारी जोसेफने शनिवारी सनरायझर हैदराबादच्या 6 फलंदाजांना केवळ 12 धावांत तंबूत परतावले. अल्झारीच्या या भेदक वेगवान माऱयामुळे मुंबईला आयपीएलमध्ये एका शानदार विजयाची नोंद करता आली. या यशानंतर अतिशय आनंदी प्रतिक्रिया देताना वेस्ट इंडियन जोसेफने यंदाच्या आयपीएल पदार्पणातच मला लाभलेले यश खरोखरच स्वप्नवतच आहे, अशी भावना बोलून दाखवली.
अतिशय मृदुभाषी असलेल्या जोसेफने यंदाच्या आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी साकारत 2008 च्या शुभारंभी आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरच्या 14 धावांत 6 बळी या विक्रमी कामगिरीपुढे एक पाऊल टाकले. तेही हंगामातील आपल्या पहिल्याच लढतीत. गोलंदाजीत बळींचा षटकार ठोकणाऱ्या अल्झारीने आपल्या या विक्रमी कामगिरीसाठी फक्त 12 धावाच खर्च केल्या. तब्बल 11 वर्षे अबाधित असलेला हा विक्रम जोसेफने मोडला. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऍण्ड्रय़ू टायने आपल्या पदार्पणात 17 धावांच्या मोबदल्यात 5 बळी घेतले होते.
जोसेफने टिपले बहुमूल्य मोहरे
आपल्या भेदक वेगवान माऱयाने अल्झारी जोसेफने ‘डेंजर मॅन’ डेव्हिड वॉर्नर, विजय शंकर, दीपक हुडा, रशीद खान, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल हे बहुमूल्य मोहरे टिपत मुंबईला शानदार विजय मिळवून दिला. मुंबईच्या 7 बाद 136 या किरकोळ वाटणाऱया आव्हानाचे रक्षण करताना मुंबईच्या गोलंदाजांनी थंड डोक्याने अफलातून मारा करीत हैदराबादची दाणदाण उडवली. अर्थात अल्झारी जोसेफ आणि मुंबईच्या अन्य गोलंदाजांना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय खेळपट्टीचीही साथ लाभली. त्यामुळेच मुंबईचे माफक आव्हानही हैदराबादच्या स्टार फलंदाजांना पेलवले नाही. त्यांचा डाव 17.4 षटकांतच 96 धावांवर गडगडला.
मुंबईला पुन्हा आयपीएलचा मुकुट मिळवून द्यायचा आहे
मी मैदानात उतरलो की संघाला विजय मिळवून देण्यासाठी जीव लावून गोलंदाजी करणे मला आवडते. या एका यशस्वी कामगिरीवर समाधान मानणारा मी नाहीय. मला यंदा माझ्या संघाला मुंबई इंडियन्सला आयपीएल जेतेपदाचा मुकुट मिळवून द्यायचा आहे असे सांगून जोसेफ म्हणाला, वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हतीच मुळी. त्यामुळेच आम्ही योजनात्मक कामगिरी साधत आमचे मर्यादित धावसंख्येचे रक्षण करू शकलो. मुंबईला प्रत्येक लढतीत विजय मिळवून देण्यासाठी मी जीव ओतून गोलंदाजी करणार आहे.






























































