अमरावतीत रवी राणा-भाजपमध्ये वाद पेटला, कार्यकर्त्यांनी राणा दांपत्याच्या बोर्डाला काळे फासले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा भाजपला पाठिंबा देत आहे. दुसरीकडे अमरावतीत भाजपचे कार्यकर्तेच राणा दांपत्याविरोधात रस्त्यावर उतरले आहे. मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांनी राणा दांपत्याच्या बोर्डाला काळे फासले. राणा राज्य-केंद्रात भाजप नेत्यांच्या पाया पडतात आणि अमरावतीत भाजप नगरसेवकांनी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, असा गंभीर आरोप भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी केला आहे.

तुषार भारतीय यांनी मंगळवारी सकाळी प्रभाग क्र 19 साईनगर येथील सातुर्णा चौक ते अकोली रेल्वे स्टेशनपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर लावलेल्या फलकाला आपल्या कार्यकर्त्यासह जाऊन काळे फासले. ‘आमदार रवी राणांनी आमच्या नगरसेवकांनी मंजूर केलेल्या निधीच्या कामाच्या ठिकाणी स्वतःचे बोर्ड लावले. तसेच तो निधी आणि काम त्यांनी मंजूर केल्याचा दावा केला. म्हणून आज आम्ही त्यांच्या फलकांना काळे फासले. बडनेरे मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी त्यांनी असे कृत्य केले असेल त्या त्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता फलकाला काळे फासल्याशिवाय राहणार नाहीत’, असा इशारा तुषार भारतीय यांनी दिला.

राणांना ईडी चौकशीचा इशारा
रवी राणा यांनी बेवारस संपत्ती जमा केली आहे. राणांनी काल विमानाने त्यांचा रिसॉर्ट किती मोठा आहे हे दाखवले. वेळ आल्यास त्याच्या चौकशीचीही मागणी करू, असा इशारादेखील यावेळी तुषार भारतीय यांनी दिला.