
अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होत आहे. परंतु या यात्रेवर 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सावट अजूनही घोंघावत आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर चांगलाच परिणाम झालेला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीतून तब्बल 20 टक्के घट झाल्याचे समजते आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीमध्ये घट झाली असल्याची माहिती, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. यावर्षी अमरनाथ यात्रेकरूंच्या संख्येत झालेली घट पहलगाम हल्ल्याशी थेट संबंधित असल्याचे उपराज्यपालांनी स्पष्ट केले. तसेच यावर अधिक बोलताना उपराज्यपाल म्हणाले, यापूर्वी 2.36 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी यात्रेसाठी नोंदणी केली होती. परंतु यावेळी आतापर्यंत फक्त 85,000 जणांची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही घट जवळपास 20 टक्के इतकी आहे.

येत्या काही दिवसांमध्ये ही नोंदणी वाढेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. अमरनाथ यात्रा 3 जुलै रोजी सुरू होणार आहे आणि 9 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. गेल्या वर्षी यात्रेत 12 वर्षांतील सर्वाधिक भाविकांची नोंद झाली होती. गतवर्षी तब्बल 5 लाखांहून अधिक भाविकांनी पहलगाम यात्रेस भेट दिली होती.
यंदा मात्र वाढत्या सुरक्षेच्या चिंतेमुळे या यात्रेसाठी भाविकांची नोंदणी संख्या खूपच कमी झाली आहे. यावेळी उपराज्यपालांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) कंपन्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिस, लष्कर आणि सीएपीएफने एक निर्दोष सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. तसेच अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर चोख सुरक्षा असणार आहे.

यंदा या वर्षीच्या यात्रेत हेलिकॉप्टर सेवांचा समावेश नसणार आहे. यात्रेचा परिसर नो-फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रेत यात्रेकरूंसाठी दोन मुख्य मार्ग आहेत, पारंपारिक पहलगाम मार्ग आणि लहान बालटाल मार्ग. त्यांनी सांगितले की, गुहेकडे जाणारा मार्ग पूर्वी सुमारे 5 फूट रुंद होता, तो आता 12 फूट रुंद करण्यात आला आहे. या सर्व मार्गावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कश्मिरच्या पर्यटनावर चांगलीच संक्रात आली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी निःशस्त्र पर्यटकांवर निर्दयीपणे गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाले होते.



























































