
ऑनलाईन शॉपिंगचा अनुभव हा कधीकधी त्रासदायक आणि धक्कादायक असतो. महागड्या फोनच्या जागी साबणाच्या वड्या डिलिव्हर होणं, एखादा कपडा मागवला तर त्या ऐवजी भलताच कपडा येणं असे प्रकार घडलेले आहेत. पण, केरळमध्ये एका माणसाला चक्क पासपोर्ट डिलिव्हर झाला आहे.
या माणसाचं नाव मिधुन बाबू असं आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कनियमबेट्टा येथे तो राहतो. त्याने अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून 30 ऑक्टोबर रोजी पासपोर्टचं कव्हर मागवलं होतं.
दोन दिवसांनी म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी त्याला ते पार्सल डिलिव्हर झालं. त्याने पॅकेट उघडलं आणि कव्हर तपासलं. त्या पार्सलमध्ये कव्हरसकट एक पासपोर्टही डिलिव्हर झाला होता. हा पासपोर्ट त्रिसुर जिल्ह्यातल्या कुन्नमकुलम इथे राहणाऱ्या एका मुलाचा होता. ते पाहून मिधुनला काही समजेना.
त्याने अॅमेझॉनला फोन केला. पण, त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद आला नाही. अखेर त्याने तो पासपोर्ट नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये सुपूर्द केला. हा प्रकार सोशल मीडियावरही व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला.
हे पासपोर्ट कव्हर मिधुन यांच्या आधी एका माणसाने स्वतःसाठी मागवलं होतं. मात्र, ते न आवडल्याने त्याने अॅमेझॉनला परत केलं. पासपोर्ट कव्हर कसं आहे, ते पाहण्यासाठी त्याने आपल्या मुलाचा पासपोर्ट त्यात ठेवला होता. कव्हर परत करताना तो त्यातून काढला गेला नाही आणि ते कव्हर तसंच परत करण्यात आलं. अॅमेझॉननेही ते न बघता तसंच मिधुनला पाठवलं. त्यामुळे तो पासपोर्टही त्याला डिलिव्हर झाला.




























































