
रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात रविवारी सायंकाळनंतर ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबाघाट येथे पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती. परतीचा पाऊस जोरदार बरसत असल्यामुळे ही दरड कोसळल्याचे सांगण्यात आले. आंबा घाटात दरड कोसळताच दोन्ही बाजूला चार चाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बांधकाम विभागाने काही तासात शर्थीचे प्रयत्न करुन कोसळलेली दरड हटविल्याने वाहतूक पूर्ववत झाली.
आंबा घाटातील दख्खन गावाजवळ ही दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवण्याचे काम तातडीने सुरू केले. अवजड वाहतूक बंद असताना पुन्हा एकदा आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग या परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याने कोणताही अनर्थ न घडता जोरदार पावसातच शर्थीचे प्रयत्न करत बांधकाम विभागाने दखन गावाजवळ कोसळलेली ही दरड हटवली आणि काही तास बंद असलेली वाहतूक पुन्हा सुरु झाल्याने छोट्या वाहनचालकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.
























































