साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि हेमाडपंती स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे अंतरंगातील झाकोळलेले नक्षीकामाचे सौंदर्य पुन्हा उजेडात येऊ लागले आहे. या कामाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने नुकतीच सुरुवात केली आहे. सध्या मंदिराच्या पितळी उंबरठय़ाच्या आतील छतासह अन्य ठिकाणी असलेल्या काळ्या दगडाच्या पाचही झुंबरांचे मूळ सौंदर्य समोर आले आहे.
गेल्या काही वर्षांत मंदिरात केलेल्या अंतर्गत सजावटीत अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे मंदिरातील मूळ नक्षीकाम झाकोळले गेले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराचे मूळ रूप खुले करण्याची मागणी भक्तांकडून होत होती. गेल्या 20-25 वर्षांपूर्वी बुजविलेले मंदिरालगतचे प्राचीन मनकर्णिका कुंड काही महिन्यांपूर्वी खुले करण्यात आले. अजूनही या कुंडाचे काम सुरू आहे. त्यातच आता मंदिराच्या अंतर्गत भागातील मूळ सौंदर्य खुले करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून मंदिरात बसविण्यात आलेल्या संगमरवरी फरशा काढण्याचे टेंडर देवस्थान समितीने नुकतेच काढले आहे.
दरम्यान, गाभाऱयातील मूळ सौंदर्य खुले करण्यात येत असून, नुकतेच पितळी उंबऱयाच्या आतील झुंबरासह मंदिराच्या चारही शिखरांखालील कासव, महाकाली, महासरस्वती, गणपती मंदिर येथील नक्षीकामाचा उत्तम नमुना असलेले दगडी झुंबरांचे सौंदर्य पुन्हा खुलले आहे. ही दगडी झुंबरे सुमारे 4 ते 5 फूट उंच व रुंद आकाराची आहेत. 1977 ते 79 या कालावधीत येथे मोठमोठय़ा खिळ्यांच्या साहाय्याने मंदिराच्या दगडी पाषाणात कायमस्वरूपी लोखंडी बारला ही काचेची झुंबरे लटकवलेली होती. आता ही काचेची झुंबरे हटविण्यात आली आहेत.
























































