घराला आग लावायला निघालेल्या वेड्या संजय शिरसाटवर कारवाई करा, अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र

मी वेडा माणूस आहे, घराला आग लावायला कमी करणार नाही, असे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. असे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्र्यांच्या प्रतिष्ठsला बाधा आणणारे असून लोकशाहीतील मंत्र्याकडून अपेक्षित जबाबदारी आणि संयमाचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली.

अंबादास दानवे यांनी यासंदर्भात राज्यपालांना आज पत्र दिले. छत्रपती संभाजीनगर येथील वेदांत हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी हे असंसदीय, असंवैधानिक आणि सभ्यतेला धरून नसलेले वक्तव्य केले होते. जाहीरपणे प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी केलेले हे वक्तव्य आक्षेपार्ह असून त्यामुळे समाजात द्वेष व वितुष्ट पसरण्याची शक्यता आहे. शिरसाट यांनी लोकशाही मूल्यांचा अवमान केला आहे. त्यामुळे मंत्रिपदाची शुचिता, सभ्यता आणि लोकशाही मूल्यांचा उचित सन्मान राखला जाण्याच्या दृष्टीने शिरसाट यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी विनंती दानवे यांनी पत्रात केली आहे.