
अमेरिकेने टॅरिफचा दणका देताच मोदी सरकारने वस्तू व सेवा करात (जीएसटी) सुधारणांचे पाऊल उचलले आहे. आता कुठल्याही वस्तूवर 5 टक्के आणि 18 टक्के एवढाच जीएसटी लागणार आहे. त्यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
”सात आठ वर्षे जीएसटीच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता बदल करण्याचे केंद्राला सुचले आहेत. हरकत नाही. मात्र, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारं तयार नाहीत. मात्र गेल्या 39 महिन्यांत रशियाकडून तेल घेऊन देशातील तेल कंपन्यांचे 12.6 बिलियन डॉलर्स वाचले आहेत. यातील कणभराचा रिलीफ हा सामान्य माणसाला मिळालेला नाही. आमची मागणी आहे, इंधनही कमी करा, पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरच्या खाली आणा. सामान्यांना दिलासा द्या‘, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारपासून सुरू झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने 12 टक्के व 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द केला असून नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादकांना होणार आहे.
28 टक्क्यांवरून 18 टक्के
सिमेंट, छोटय़ा कार, ऑटो पार्टस्, तीनचाकी गाडय़ा, एसी, टीव्ही, डिश, वॉशिंग मशिन्स, 300 सीसीपर्यंतच्या मोटरसायकल, बस, ट्रक, ऍम्बुलन्स.
5 टक्क्यांवरून शून्य टक्के
दूध, पनीर, स्वदेशी ब्रेड.
18 व 12 वरून 5 टक्के
नमकीन्स, भुजिया, सॉस, पास्ता, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट, कॉफी, बटर, तूप, मांस, केश तेल, टॉयलेट सोप्स, बार, शॅम्पू, टूथपेस्ट, स्वयंपाकघरातील वस्तू, सायकल, वैद्यकीय उपकरणे, कृषी साहित्य.
जीवन विमा जीएसटी मुक्त
टर्म लाइफ इन्शुरन्स, युलिप, एन्डोमेंट असा सर्व प्रकारचा वैयक्तिक जीवन विम्याला जीएसटी करातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे व्यक्तिगत विमा आता स्वस्त होणार आहे.