हेडफोनने घात केला.. लोकलचा हॉर्न ऐकू आला नाही, अंबरनाथजवळ रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू

मोबाईलच्या अतिवापराने आज अंबरनाथजवळ एका महिलेसह तिला वाचवण्यासाठी धावलेल्या तरुणाचा दुर्दैवी बळी गेला. रुळ ओलांडणाऱ्या महिलेला रेल्वेच्या हॉर्नचा आवाज ऐकू न आल्याने तिला वाचवण्यासाठी धावणाऱ्या तरुणासह दोघांचाही लोकलखाली मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथजवळील मोरीवली गावाजवळ घडली.

अंबरनाथ येथील मोरीवली गावात राहणाऱ्या वैशाली धोत्रे (45) आणि महालक्ष्मीनगर येथे राहणारा आतिष आंबेकर (29) हे दोघेही एमआयडीसीतील एकाच कंपनीत काम करत होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघेही कामावरून घरी परतत होते. आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबिनजवळील मोरीवली गावाकडे निघाला. दोघेही रुळावरून चालत निघाले होते.

वैशाली या हेडफोन लावून फोनवर बोलत रेल्वेचा रुळ ओलांडत होत्या. यावेळी लोकल येत असल्याचे आतिष व इतर लोकांनी पाहिले. त्यांनी वैशाली यांना जोरात हाका मारल्या, पण कानात हेडफोन असल्याने त्यांना लोकलचा हॉर्न आणि मारलेल्या हाका ऐकू गेल्या नाहीत. वैशाली यांना वाचवण्यासाठी आतिष धावला, परंतु दुर्दैवाने लोकलने दोघांनाही धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.

मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती

वैशाली यांच्या पश्चात पती आणि मुलगी व मुलगा आहे. त्यांचे पती हे रिक्षाचालक असून यंदा मुलीचे लग्न करण्याची तयारी कुटुंब करत होते. वैशालीच्या मृत्यूने धोत्रे कुटुंबावर आघात झाला आहे.

एकुलता मुलगा

आतिष हा त्यांच्या वृद्ध आईवडिलांचा एकुलता एक आधार होता. त्याच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाले होते. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे