आंबोलीत रानकुत्र्याच्या हल्ल्यात सहा जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीत शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास जाधववाडी येथे मांगरात दबा धरून बसलेल्या रानकुत्र्याने स्थानिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 6 जण जखमी झाले आहेत. वन्य प्राण्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याने येथील ग्रामस्थमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आंबोली येथे कोळसुंदा या प्राण्याने काही ग्रामस्थांवर प्राणघातक हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावठणवाडी, सतिचीवाडी येथील नागरिकांना जबर जखमी केले आहे. यात अशोक जाधव यांच्या हाताला, अक्षय जाधव यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. तर कृष्णा जाधव यांच्याही हाताला, यशवंत जाधव यांच्या छातीला या हल्ल्यात जखमी केले आहे.

तो वन्यप्राणी कोळसुंदा अर्थात रानकुत्रा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तो पिसाळलेला असण्याची शक्यता असून त्याने अनेकांना जखमी केले असल्याने त्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी वनविभागाकडे केली आहे.