अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन आज संभाजीनगरात, रत्नपुरात ध्यान साधना करणार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची पत्नी हिलरी क्लिंटन या उद्या मंगळवारी दुपारी विशेष विमानाने संभाजीनगरात येणार असून, त्या रत्नपुरातील मंबापूर गावापुढील सहजपुरात होणार्‍या ध्यान साधनेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर त्या अजिंठा आणि वेरूळ येथील लेणीही पाहणार असून, त्यासाठी शहर व परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

पोलीस खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी हेलरी क्लिंटन या मंगळवारी दुपारी एक वाजता अहमदाबाद येथून विशेष विमानाने संभाजीनगर विमानतळावर येणार आहेत. त्यांचा ताफा थेट रत्नपुरातील सहजपूर येथे पोहचणार असून, तेथे सुरू असलेल्या ध्यान साधनेत त्या सहभाग घेणार आहेत. मंगळवारी त्यांचा मुक्काम वेरूळ परिसरातील निवृत्त सचिव डांगे यांच्या फार्महाऊसमध्ये राहणार आहे. दुसर्‍या दिवशी त्यांचा ताफा जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणीकडे रवाना होईल. अजिंठा आणि वेरूळची लेणी पाहिल्यानंतर हिलरी क्लिंटन विशेष विमानाने गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती एका उच्चपदस्थ पोलीस अधिकार्‍याने दिली. त्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर पोलिसांपाठोपाठ ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयानेही तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.