
कोरोना महामारीपाठोपाठ धडकलेले ‘आइडा’ चक्रीवादळ व त्यानंतर झालेला रेकॉर्डब्रेक पाऊस यामुळे अमेरिकेत आणीबाणी जाहीर झाली आहे. पावसाने न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी या शहरांची पुरती वाताहात उडवली आहे. रस्ते, रेल्वे टर्मिनससह सगळीकडे पाणीच पाणी साचले असून हजारो कुटुंबीयांचे संसार पाण्याखाली गेले आहेत. विमान वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे.
न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच पुरामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. शहरातील सबवे स्टेशन्सना धबधब्याचे तर अंतर्गत रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले आहे. न्यूजर्सी, मल्लिका हिल परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे, रस्त्यांची स्थिती धोकादायक बनली आहे. या पूरसंकटात नागरिकांना वाचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कच्या मेयर बिल डी ब्लासियो यांनी गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून आणीबाणीची घोषणा केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवल्या जातील, असे ब्लासियो यांनी जाहीर केले.
विमानतळाची धावपट्टी की तळे?
न्यूजर्सीच्या नेवार्क विमानतळावर बुधवारी रात्री 8 ते 9 या एका तासात 3.24 इंच पावसाची नोंद झाली. या धुवाधार पावसामुळे विमान वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. तसेच न्यूयॉर्कच्या लागार्डिया आणि जेएफके येथील विमानतळाच्या धावपट्टय़ांनाही तळ्याचे स्वरूप आले असून विमानतळावरील कामगार जागोजागी अडकले आहेत. त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढणे मुश्कील बनले आहे.
चक्रीवादळाचा धोका कायम; ‘ब्लॅकआऊट’चेही संकट
पाऊस थांबण्याचे नाव घेत नसताना चक्रीवादळही घोंघावत आहे. ‘आइडा’ चक्रीवादळ पुन्हा सक्रिय बनणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. न्यूयॉर्कसह अन्य शहरांत वादळी वारे प्रचंड वेगाने वाहतील. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये, गाडय़ा चालवू नयेत असा ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो घरांची बत्ती गुल झाली असून ‘ब्लॅकआऊट’च्या संकटाची तीव्रता वाढण्याचीही भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.





























































