घुसखोरांना हाकलून लावणार; अमित शहा यांचे आश्वासन

41

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये नागरि सुधारणा कायदा लागू करणार असून घुसखोरांना हाकलून लावण्याचे आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे. बांगलादेशमधून आलेल्या बिगरमुस्लीम शरणार्थिंना हिंदुस्थानचे नागरिकत्व देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या तुष्टीकरणाच्या धोरणावर कडाडून टीका केली. पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे वाहत असून ममता बॅनर्जी यांच्या दबावतंत्राला आणि गुडंगिरीला न जुमानता जनता भाजपला विजयी करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाने स्वीकारले आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावाला घाबरून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये भीतीचे वातावरण तयार करत आहेत. त्यांनी राज्याचा विकास केलेला नाही. जनतेच्या फायद्याच्या अनेक योजनांना त्यांनी खोडा घातला आहे, असा आरोपही शहा यांनी केला. आता पश्चिम बंगालला विकास हवा आहे. त्यासाठी जनता परिवर्तन घडवणार आहे. आम्ही सत्तेत आल्यास राज्यात लोकशाही मजबूत करून विकास करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. राष्ट्रीय सुरक्षा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी नागरी सुधारणा कायदा लागू करणार असून घुसखोरांना हाकलून लावण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. नागरि सुधारणा कायदा, कलम 370 आणि 35ए याबाबत जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वोटबँकेवर नजर ठेवत तृष्टीकरणाचे राजकारण करत ममता बॅनर्जी यांनी संस्कृती नष्ट केल्याचा आरोपही शहा यांनी केला. भ्रष्टाराराने राज्याला पोखरले आहे, असेही ते म्हणाले. जनतेने कोणत्याही दडपहशाही,दबाव किंवा गुडंगिरीला न जुमानता एकजुटीने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या एका वक्तव्यावरून विनाकारण वाद उभा करण्यात आला आहे. त्यांना एका प्रकरणात गोवण्यात आले होते. हिंदू दहशतवादाच्या नावाखाली एका बनावट प्रकरणात त्यांना गोवण्यात आले. प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ते प्रकरण बनावट असल्याचे उघड झाले आहे. समझौता एक्स्प्रेस स्फोटातील खऱ्या आरोपींना कोणी सोडले असा सवालही त्यांनी केला. बाटला एन्काउंटरनंतर यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अश्रू ढाळले होते. मात्र, शहिदासांठी त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले का असा सवालही त्यांनी केला. देशातील जनतेला काँग्रेसचा खरा चेहरा समजला आहे. जनता आता राष्ट्रीय सुरक्षेच्या बाजूने मतदान करणार आहे. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवादाविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे दहशतवाद फोफावल्याचा आरोपही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या