
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत असून इथे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार बुधवारी थंडावला. झारखंडमध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा स्वत: आले होते. भाजपच्या सभा भरगच्च असतात. मात्र बुधवारी त्यांचा अपेक्षाभंग झाला. अपेक्षित गर्दी न झाल्याने ते नाराज झाले होते.
अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर मंचावर बसलेल्या नेत्यांकडे त्यांनी एक जळजळत कटाक्ष टाकला. यानंतर त्यांनी म्हटले की ‘मला मूर्ख बनवू नका, मी पण बनिया आहे या दहा-पंधरा हजार लोकांमुळे तुम्ही निवडून याल का?’ नेत्यांकडे बघत त्यांनी केलेलं हे विधान सभेला आलेल्या सगळ्यांना ऐकू गेलं होतं. ‘द टेलिग्राफ’ या वर्तमानपत्राने यासदंर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे.
नेत्यांना झापल्यानंतर अमित शहा यांनी त्यांचा मोर्चा सभेसाठी आलेल्या लोकांकडे वळवला. ‘मी एक उपाय सांगतो करणार का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही सगळ्यांनी किमान 25 लोकांना फोन करा आणि भाजपला मत द्यायला सांगा असा आदेश शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
झारखंडमध्ये भाजपची सत्ता असून तिथे 5 टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अमित शहा यांनी चतरा आणि घडवा इथे दोन सभा घेतल्या. गेल्या आठवड्यात त्यांनी लातेहार आणि लोहारदागा इथे सभा घेतल्या होत्या. या चारही सभांना 10 ते 15 हजार लोकांचीच गर्दी होती असं ‘द टेलिग्राफ’ ने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना मात्र तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यांच्या डाल्टनगंजच्या सभेला 60 हजारांची तर गुमलातील सभेला 2 लाख लोकांची गर्दी झाली होती.





























































