
सामना ऑनलाईन । हैदराबाद
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच राम मंदिराची उभारणी सुरू होईल, अशी घोषणाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे एका बैठकीत केली. भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीतील त्यांच्या या वक्तव्याची माहिती पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी. शेखरन यांनी दिली.
या घोषणेची ‘बातमी’ होताच भाजप हैराण झाला. घोषणा अंगाशी येणार हे लक्षात आले आणि मग तातडीने ‘शहा असे काही बोललेच नाहीत’ असा खुलासा पक्षाने शेखरन यांनाच करायला लावला. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजप ठाम आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे ते म्हणाले.
दरम्यान, पी. शेखरन यांनी पत्रकारांना अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. वेळेआधी लोकसभा निवडणुका घेण्याचा कोणताही विचार नाही असेही शहा यांनी त्या बैठकीत स्पष्ट केले, असेही ते सांगून मोकळे झाले.



























































