
गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला आले होते. मात्र कॉलेजच्या या व्यासपीठावरून त्यांनी थेट शिवसेनेवरच टीका केली. भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना तुम्ही टार्गेट करता? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जर आम्ही तुमच्या या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती अशी दर्पोक्ती अमित शहा यांनी केली.
नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित भावी डॉक्टर विद्यार्थी, त्यांचे डॉक्टर प्राध्यापक आणि पालक यांचे प्रबोधन करताना शहा यांनी एक लंबेचौडे राजकीय भाषण ठोकले. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता न आल्याचे दुःख त्यांच्या भाषणात जाणवत होतेच, पण बोलण्याच्या नादात त्यांनी अनेक वल्गनाही केल्या.
मी खुलेआम वचन देतो
विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी बंद खोलीत कोणतेही वचन दिले नव्हते. मी खुलेआम वचन देणारा आणि ते वचन पाळणारा माणूस आहे असे सांगतानाच अमित शहा यांनी पुराव्यादाखल बिहारमध्ये नितीश कुमार यांना कसे मुख्यमंत्री बनवले हे सांगितले. मी कधीही बंद दाराआडील राजकारण केले नाही. मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे. कुणालाही घाबरत नाही असेही सांगायला अमित शहा विसरले नाहीत.
तीन चाकी सरकार
शिवसेनेनंतर अमित शहा यांची गाडी घसरली ती राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर. राज्यातील सरकार हे तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असून याची तिन्ही चाके वेगवेगळय़ा दिशेने जात आहेत. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे हे सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे, हे सांगायला अमित शहा विसरले नाहीत.

































































