
निवडणूक सुधारणांवरील चर्चेच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात बुधवारी जोरदार शाब्दिक चकमक झाली. मतचोरीच्या मुद्द्यावर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान राहुल यांनी दिल्याने शहा भडकले. ‘संसद अशा पद्धतीने चालणार नाही. मी कधी, काय बोलायचे ते तुम्ही ठरवू नका,’ असे शहा म्हणाले. याला गुरुवारी राहुल गांधी यांनी संसद परिसरात माध्यमांशी बोलताना उत्तर दिले.
अमित शहा काल घाबरलेले होते. त्यांनी चुकीचा भाषा वापरली. त्यांचे हात थरथरत होते. ते मानसिकदृष्ट्या खूप दडपणाखाली, दबावात आहेत हे काल संसदेत दिसले. संपूर्ण देशाने हे पाहिले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, मी ज्या गोष्टी मांडल्या त्यावर अमित शहा यांनी काहीही भाष्य केले नाही. कोणताही पुरावा दिला नाही. आम्ही जाहीरपणे, पत्रकार परिषदेमध्ये बोललो आहोत. मी त्यांना कालही सभागृहामध्ये माझ्या पत्रकार परिषदांवर चर्चा करूयात असे आव्हान दिलेले. पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.
ते घाबरलेले, त्यांचे हात थरथरत होते; राहुल गांधी यांनी घेतला अमित शहांच्या लोकसभेतील भाषणाचा खरपूस समाचार pic.twitter.com/wpxYWWidOq
— Saamana Online (@SaamanaOnline) December 11, 2025
बुधवारी लोकसभेत काय घडलं?
निवडणूक सुधारणांच्या चर्चेला उत्तर देताना अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली. ‘विरोधी पक्ष मतचोरीचे आरोप करतो आणि एसआयआरला विरोध करतो. तुम्ही जिंकले की मतदार यादी चांगली, तुम्ही हरले की गडबड. हा दुटप्पीपणा आहे. काही कुटुंबे पिढ्यान्पिढ्या मतचोरी करत असताना विरोधी पक्षनेते आमच्यावर मतचोरीचे आरोप करत आहेत, असे शहा म्हणाले.
मी कधी बोलायचे हे मीच ठरवणार
‘मला अनेक वर्षांचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. विरोधी पक्षनेते म्हणतात तसे होणार नाही. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देणार, पण तो क्रम मी ठरवणार’, असे शहा म्हणाले.
निवडणूक आयुक्तांना कारवाईपासून संरक्षण का दिले, ते आधी सांगा!
शहा यांच्या उत्तरास राहुल गांधींनी आक्षेप घेतला. ‘मुख्य निवडणूक आयुक्तांना कारवाईपासून संरक्षण का दिले गेले? एवढाच माझा प्रश्न आहे. यामागे नेमका काय हेतू आहे याचे आधी उत्तर द्या. हरयाणात 19 लाख बनावट मतदार आहेत, याचे पुरावे आम्ही दिलेत. शहा यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी माझ्याशी या मुद्दय़ावर जाहीर चर्चा करावी’, असे राहुल म्हणाले.
हा पळ काढण्याचा प्रयत्न
शहा यांच्या या उत्तरावर राहुल गांधी पुन्हा उठले. ‘हा पळ काढण्याचा प्रयत्न आहे. हे भीतीतून आलेले उत्तर आहे. खरे उत्तर नाही. मंत्री महोदय घाबरले आहेत’, अशा शब्दांत राहुल यांनी शहांना डिवचले.

























































