महाराष्ट्रातील निवडणुकीपर्यंत अमित शहा यांच्याकडेच भाजपाची धुरा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात अमित शहा यांची केंद्रीय गृहमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजप अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, अशी भावना अमित शहा यांनी बोलून दाखविली असली तरी भाजप अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून शहा यांची लवकर मुक्तता होणार नसल्याचीच चिन्हे दिसत आहेत.

नव्या भाजपाध्यक्षाच्या निवडीबाबत चाचपणी करण्याबाबत अमित शहा यांनी आज बोलावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रासह हरयाणा व झारखंडची विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत आपणच अध्यक्षपदी कायम राहावे असा आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे नव्या भाजपाध्यक्षांची निवड डिसेंबरनंतरच होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या ‘एक व्यक्ती एक पद’ या धोरणानुसार अमित शहा यांनी अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून अनेक नावांची चाचपणी करण्यात आली. मात्र महाराष्ट्रासह हरयाणा व झारखंडमध्ये पुन्हा सत्ता मिळविणे हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या तिन्ही राज्यांतील निवडणूक होईपर्यंत कोणतीही रिस्क पक्षाने स्वीकारून नये, असाच एकमुखी सूर आजच्या बैठकीतील विविध पदाधिकाऱ्यांनी लावल्याचे त्रांनी सांगितले. विशेषतः निवडणुका होत असलेल्या महाराष्ट्र, हरयाणा व झारखंडमधील पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक होईपर्यंत शहा हेच अध्यक्षपदी राहावेत, अशी आग्रही भूमिका मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

कार्यकारी अध्यक्षाचा पर्याय

भाजपच्या दृष्टीने राजकारणाचा भाग म्हणून महाराष्ट्रासह तीन राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे लोकसभेत दणदणीत बहुमताने निवडून आल्यानंतर या तिन्ही राज्यांत मोदी सरकार-2 च्या लोकप्रियतेची खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे शहा यांना तूर्तास अध्यक्षपदी कायम ठेवत त्यांच्या मदतीला कार्यकारी अध्यक्षाची निवड केली जाण्याची शक्यता भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली. भाजपच्या घटनेत कार्यकारी अध्यक्षाची तरतूद नसली तरी हे पद निर्माण केले जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. असे झाले तर अमित शहा यांचे खासम्खास जे. पी. नड्डा यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड पक्की मानली जात आहे.

प्रदेशाध्यक्षपद नक्कीच स्वीकारेन!

पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी पार पाडण्यास आपली तयारी आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारण्याची आणि उत्तमरीत्या पार पाडण्याची तयारी असल्याचे महसूल मंत्री, पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.