
हॉटेलमध्ये आयोजित लग्न सोहळ्यात कॉपीराईटच्या नावाखाली पैसे घेणाऱ्याविरुद्ध पोलिसांकडे बिनधास्त तक्रार करा, पुणे पोलिसांकडून तुम्हाला कायमस्वरूपी सहकार्य केले जाईल. त्यामुळे नागरिकांचे पैसे बचत होण्यास मदत होणार आहे. लग्न सोहळा बंद पाडण्याची धमकी देत आर्थिक लूट करणाऱ्यांचा डाव उधळून लावण्याचे आवाहन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. पोलीस आयुक्तालयात आयोजित पूना हॉटेल असोसिएशनच्या बैठकीत त्यांनी संघटनेला मार्गदर्शन केले. यावेळी विविध हॉटेलचे मालक चालक उपस्थित होते.
पंचतारांकित हॉटेलसह बँक्वेटमध्ये लग्न समारंभाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये कॉपीराईट अॅक्टनुसार संबंधित कार्यक्रमांना संगीत आणि गाण्यांच्या वादनासाठी सूट देण्यात आलेली आहे. मात्र, तरीही आयोजकांकडून कॉपीराईटच्या नावाखाली लाखो रूपयांची लूट केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पूना हॉटेल असोसिएशनची बैठक घेण्यात आली. त्यानुसार हॉटेल मालकांनी संबंधित पैसे उकळणाऱ्याविरुद्ध तक्रार देणे आवश्यक आहे.
कॉपीराईटच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी पोलीस हॉटेल संघटनेसोबत कायम राहणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे. हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात संगीत आणि गाण्यांबाबत कॉपीराईटची आवश्यकता नसून बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये संघटनेने त्यांच्या अडचणी मांडून चर्चा केली. त्याशिवाय कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याअंतर्गत दोन कंपन्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत संघटनेने आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे कौतुक केले आहे.
हॉटेलसह बँक्वेटमध्ये आयोजित लग्न सोहळ्यामध्ये गाण्यांसह संगीत वादनाला कॉपीराईटसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी पूना हॉटेल असोसिएशनसोबत बैठक घेतली. त्यानुसार विस्तृत चर्चा करण्यात आली असून कॉपीराईटबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याशिवाय संघटनेच्या अडचणीवर चर्चा करण्यात आली.
– अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे



























































