स्वतःला खलनायक म्हणूनही आजमावून पाहिले – अमोल पालेकर

‘मी रंगभूमी, प्रायोगिक व समांतर कलाप्रवाह, चित्रपट, लघुपट, चित्रकला, संगीतकला अनेक कलाप्रकारांमध्ये रमलो, काम केले. व्यावसायिक यश मिळवले, पण तिथेच न थांबता टाईपकास्ट होणे टाळले. मी नायक म्हणून लोकप्रिय, यशस्वी असतानाच स्वतःला खलनायक म्हणूनही आजमावून पाहिले,’ अशी प्रांजळ कबुली ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक-निर्माते, लेखक अमोल पालेकर यांनी येथे दिली.

साहित्य संमेलनात सायंकाळी अमोल पालेकर लिखित ‘ऐवज-एक स्मृतिगंध’ या पुस्तकावर चर्चात्मक कार्यक्रम झाला. चर्चेत पालेकर यांच्यासह संध्या गोखले यांचाही सहभाग होता. वृंदा भार्गवे यांनी संवाद साधला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.

आत्मकथन आत्मगौरवापासून दूर ठेवणे आणि आपण आपल्याच जगण्याकडे तटस्थपणे, दूरस्थपणे पाहणे, असा प्रयत्न ‘ऐवज-एक स्मृतिगंध’च्या लेखनातून केला आहे, असे सांगून अमोल पालेकर म्हणाले, कोणत्याही प्रकारचा तोचतोचपणा आणि एकरेषीय विचार मला आवडत नाहीत. विविध माध्यमांतून, आयामांतून स्वतःला सतत पडताळून आणि तपासून पाहणे, हे मला माणूस आणि कलावंत म्हणूनही सजगपणाचे वाटते. तपशिलांमध्ये न अडकता रोचक पद्धतीने आत्मकथन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मकथनात आत्मगौरव होण्याचा संभव असतो, तो जाणीवपूर्वक टाळला आहे. हे स्मरणरंजन नक्कीच आहे, पण तेवढेच नाही. मागे वळून पाहताना आपल्या काय चुका झाल्या, काय सुधारणा हव्या होत्या याचे आकलन व्हावे असाही प्रयत्न होता.

आस्तिकपणाच्या छटा मी मानत नाही

आस्तिकपणाच्या कोणत्याच छटा मी मानत नाही. त्यामुळे माझ्या बाबतीत घडलेल्या, बिघडलेल्या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार राहतो. असे जगणे सोपे नसते. आपले आयुष्य आपल्याच तळहातावर घेत तोलत तपासत राहावे लागते. आत्मकथन आत्मगौरवापासून दूर ठेवणे आणि आपण आपल्याच जगण्याकडे तटस्थपणे, दूरस्थपणे पाहणे असा प्रयत्न ऐवजच्या लेखनातून केला. ठिकठिकाणी आधुनिक जगाशी नाते जोडणारे क्यूआर कोड यासाठी दिले आहेत, ज्यायोगे तरुण वाचकांनाही मी जगलेल्या काळाशी जोडून घेता यावे, असे पालेकर यांनी सांगितले.