कोरोना लसीकरणाच्या अचूक नियोजनासाठी रंगीत तालीम – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नियोजनबद्ध पद्धतीने कोरोना लसीकरण पार पाडण्याची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला. लसीकरणाचे चारही टप्पे यशस्वीपणे पूर्ण होऊन सर्वांपर्यंत लस पोहोचण्यासाठी अचूक नियोजन करण्याच्या हेतूने ही रंगीत तालीम होती, असे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पस व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तसेच तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज सकाळी ड्राय रन घेण्यात आला.  त्यानिमित्त पालकमंत्री ठाकूर यांनी जिल्हा रूग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पसमधल्या लसीकरण केंद्रातील सुविधांची पाहणी केली व तेथील पथकांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले.

नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी लसीकरण केंद्राची रचना आहे. त्यानुसार प्रथम नोंदणी कक्षात प्रत्येकाच्या माहितीची नोंद झाली. कोविन ॲपच्या ट्रायल बेस्ड व्हर्जनमध्ये व्यक्तींच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार लस घेणाऱ्या व्यक्तीला ओटीपी प्राप्त झाला. संबंधिताने नोंदणी कक्षात तो ओटीपी सांगताच इतर नोंदी व लसीकरणाचे प्रात्यक्षिक झाले.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, मागील जवळजवळ संपूर्ण वर्ष कोरोना महामारीने ग्रासले होते. या काळात आवश्यक दक्षता, उपचार व आरोग्य सुविधांची उभारणी शासनाकडून सर्वदूर करण्यात आली. आता लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शासनाने लसीकरणाच्या अनुषंगाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. फ्रंटलाईन वॉरिअर्सला प्रथमत: लस देण्यात येणार आहे. या सर्वांचे मनोबल वाढविणे, अचूक नियोजन व शिस्तबद्धता राखून लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ड्राय रन घेण्यात आला.

चार टप्प्यात लसीकरण

चार टप्प्यात लसीकरण होणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर (शासकीय आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स), दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर (गृह, महसूल, होमगार्ड संबंधित अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी), तिसऱ्या टप्प्यात हायरिस्क व्यक्ती व 50 वर्षावरील व्यक्ती व चौथ्या टप्प्यात उर्वरित सर्व व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेतील हेल्थ केअर वर्करचे लसीकरण सुरुवातीच्या टप्प्यात होईल. त्यानुसार सुमारे 16 हजार 262 हेल्थ केअर वर्करचे लसीकरण अपेक्षित आहे.