अमरावतीमधील ग्रामपंचायतीत गैरव्यवहार, दोन ग्रामसचिव निलंबित

अमरावती पंचायत समिती अंतर्गत येणारे कठोरा बु. ग्रामपंचायतमध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित ग्रामसेवकाचे नाव तुकाराम बळीराम जाधव व एस व्ही बादशे असून त्यांच्यावर खातेनिहाय चौकशीचे आदेश सुध्दा देण्यात आले आहे.

कठोरा बु. येथील माजी सरपंच बाबाराव दहिकर व काँग्रेसचे कार्यकर्ते किरण महल्ले यांनी या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार 3 सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीत  कठोरा ग्रामपंचायत मध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका चौकशीत ठेवण्याता आला होता.

कठोरा बु. ग्रा पं मधील सुरूवातीला एस व्ही बादशे कार्यरत होते. त्यांनी 14 व्या वित्त आयोगाकडून आलेल्या निधीतून अनेक गैरव्यवहार केले. त्यानंतर बादशे यांची बदली झाली त्यांच्या जागी आलेल्या तुकाराम तुळशीराम जाधव यांनी सुध्दा कामात अनियमितता करत असताना सामान्य फंडातील रक्कम एकाच पुरवठा धारकास दोन वेळा अदा केली होती. या सोबतच इतरही गैरव्यवहार केले होते. त्यामुळे तुकाराम जाधव यांना सुध्दा निलंबित करण्यात आले होते. निलंबनाच्या कालावधीत निलंबित ग्रामसेवक बादशे यांना या काळात पंचायत समिती अचलपूर येथे हजर राहावे लागणार आहे यासोबतच ग्रामसेवक तुकाराम जाधव यांना दर्यापूर पंचायत समिती हजर राहावे लागणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे 18 ग्रामपंचायतमध्ये लाखो रूपयाचा गैरव्यवहार झाला आहे. 3 सदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत संबंधित ग्रामसेवकासोबतच ग्रामपंचायतच्या सरपंचासह काही सदस्यांवर सुध्दा ठपका ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर नेमकी कुठली कारवाई केली जाते यावर अमरावती पंचायत समितीचे लक्ष्य लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या