अमृता फडणवीस यांना आवरा! किशोर तिवारी यांचे संघाला पत्र

2164

राजकारणात अवाजवी ढवळाढवळ करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा, असे विनंतीपत्र विदर्भातील शिवसेनेचे नेते आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांना लिहिले आहे.

अमृता फडणवीस यांनी शिवसेना नेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेतील उल्लेखाचा निषेध करीत तिवारी यांनी जोशी यांना खरमरीत पत्र पाठवले आहे. अमृता फडणवीस यांचा राजकीय हस्तक्षेप हा धक्कादायक आहे. भाजपमधील कोणत्याही नेत्याची पत्नी अशी ढवळाढवळ करीत नाही. अमृता फडणवीस यांचे वक्तव्य संघ विचारधारेला मान्य आहे का, असा सवालही तिवारी यांनी केला आहे. अमृता यांना भाजप हा पक्ष टेकओव्हर करायचा आहे का? त्यांच्या वर्तनामुळे 2024 मध्ये भाजपला नुकसान होऊ शकते, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे. अमृता यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असले तरी गरज नसलेला त्यांचा राजकीय हस्तक्षेप यामुळे समविचारी हिंदू पक्ष दुरावत असल्याकडेही तिवारी यांनी जोशी यांचे लक्ष वेधले आहे.

फडणवीसांचा फाजील आत्मविश्वास

देवेंद्र फडणवीस यांचा फाजील आत्मविश्वास आणि घमेंडीपणामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचे सांगत तिवारी यांनी, देवेंद्र यांनाही आवरा असे या पत्रात म्हटले आहे. फडणवीस यांच्या अरेरावीपणामुळे शिवसेना-भाजप युती तुटली, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या