
दादर येथील शिवाजी मंदिरात गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर आणि नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उद्या ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 6 वाजता होईल.
लता मंगेशकर नाटय़रसिक होत्या. त्यांनी तरुणपणी नाटकात काम केले आहे. नाटक पाहण्याच्या आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या अनेकदा श्री शिवाजी मंदिर नाटय़गृहात आलेल्या आहेत. त्याचे स्मरण म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ ट्रस्टतर्फे लतादीदींच्या तैलचित्राची तसबीर लावण्यात येणार आहे. याच वेळी नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या तैलचित्राचे अनावरण होईल. लतादीदींचे तैलचित्र प्रसिद्ध चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारले आहे. या वेळी मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघ, मुंबईच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ‘नाटय़ मल्हार’ हा कार्यक्रम होणार आहे. या अंतर्गत नाटय़ संगीत, ‘संगीत देवबाभळी’ व ‘करून गेलो गाव’ नाटकांतील प्रवेश तसेच कलाकार आणि निर्मात्यांच्या धम्माल संगीत खुर्चीची बहार रंगणार आहे.



























































