
उद्योगपती आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमी सक्रिय असतात. अनेकदा ते नवनवीन आणि हटके गोष्टी ट्विटरवर शेअर करतात. नेटिझन्सदेखील त्यांच्या पोस्टला भरभरून पसंती देतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात एक दिव्यांग तरुण अवघ्या काही सेकंदांत आपल्या व्हीलचेअरचे रूपांतर मोटरसायकलमध्ये करताना दिसत आहे.
त्याच्या या कल्पकतेने आनंद महिंद्रा भारावून गेले असून त्यांनी या तरुणाचे कौतुक केले आहे. व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी म्हटलेय, माहीत नाही हा व्हिडीओ किती जुना आहे, कुठला आहे आणि त्यातला तरुण कोण आहे, परंतु हा व्हिडीओ खरोखर नावीन्यपूर्ण आहे. दिव्यांगांच्या जीवनाला गती देण्याचा हा परिपूर्ण मार्ग आहे. हे समर्थन करण्यासारखे आहे. मला याची मदत करायला नक्कीच आवडेल. नेटिझन्सनेदेखील या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.






























































