शिवतारेंनी बारामती डॅमेज केलं तर आम्ही कल्याण डॅमेज करू, अजित पवार गटाचा मिंध्याना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारामतीत लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरण्याची घोषणा मिंधे गटाचे विजय शिवतारे यांनी केली होती. तसंच अजित पवार यांनी आपल्यासह पुरंदरच्या जनतेचा अपमान केल्याचं म्हणत त्यांचा बदला घ्यायची वेळ आल्याचंही म्हटलं होतं. त्यावर आता अजित पवार गट आणि मिध्यांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाने मिध्यांना ‘शिवतारेंनी बारामती डॅमेज केलं तर आम्ही कल्याण डॅमेज करू’ असा थेट इशारा दिला आहे.

अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हा इशारा दिला आहे. कल्याण लोकसभा जिंकणे सोपे नाही. बारामती आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील काही वाचाळवीर नेते आक्षेपार्ह बोलत आहेत. या वाचाळवीर आणि शिवराळ नेत्यांना आवरा, अन्यथा कल्याणमध्ये वेगळा निर्णय लागू शकतो, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे.

शिवतारे यांनी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उतरण्याची घोषणा केली होती. त्यावेळी शिवतारे यांनी ‘अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे. सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. अजित पवार त्या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का?’ असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर परांजपे यांनी व्हिडीओद्वारे या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा दिला आहे.